अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेले काही मित्र एका मित्राच्या घरी जमले होते. सगळेच नुकतेच नोकरीला लागल्यामुळे, त्यांचे अनुभव आणि त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटना ऐकून मजा येत होती. नोकरी करणाऱ्यांना कसलाच त्रास नसतो, दर महिन्याला पगार येतो, असे तेव्हा वाटायचे. पण त्यांना हे माहीत होते की, जास्त पगार हवा असेल तर अजून मेहनत घ्यावी लागेल, कदाचित घरापासून दूर, दुसऱ्या राज्यात किंवा शहरात जावे लागेल. त्यांच्यातील एका मित्राने आज या सर्वांना एकत्र आणले होते. आज ते एका वेगळ्या विषयावर परिसंवाद करणार होते, तो म्हणजे व्यवसाय.
त्यांनी खूप वेगवेगळ्या कल्पना मांडल्या; काहींनी तर अगदी भन्नाट युक्त्याही सुचवल्या. त्यातून ज्या व्यवहार्य वाटल्या, त्यांची यादी केली आणि मग एक कल्पना निवडून संपूर्ण प्रकल्प आराखडा (Project Plan) तयार केला. काही महिने हे सगळे त्या कामासाठी भेटायचेही. कालांतराने प्रत्येकाचे व्याप वाढले आणि स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी अधिक पैसे कमावण्याच्या नादात ते सगळे विखुरले.
दहा वर्षे लोटून गेली. सगळे मित्र आपापल्या कुटुंबात आणि कामात गुंतले होते. पण त्या एका मित्राला व्यवसाय करण्याची धून होती. त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला. काही जुन्या मित्रांसोबत नवीन मित्र घेऊन नैसर्गिक शेतीच्या भाज्या विकण्याचे ठरवले. पण सगळ्यांची आवड एक नसल्यामुळे हा प्रयोग काही महिन्यांतच बंद करावा लागला.
आता त्याला कळून चुकले होते की, जर त्याला व्यवसाय करायचा असेल आणि तोही नोकरी न सोडता, तर त्याला आधी एकट्याने चालावे लागेल. त्याप्रमाणे त्याने भविष्यात सर्वात महत्त्वाचे काय असेल यावर विचार करायला सुरुवात केली आणि त्याला सुचले, शाश्वत जीवनशैली (Sustainable Lifestyle) खूप महत्त्वाची असणार आहे. पण त्यासाठी सध्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक उत्पन्नाचे स्रोत नसताना हे कसे शक्य होईल, हा प्रश्न त्याला पडला.
हे सर्व सुरू असतानाच, तो त्याच्या मुलांच्या शाळेतील शिक्षणासंदर्भात वेगळा विचार करत होता. त्यांना शाळेत न घालता शिक्षण कसे देता येईल आणि त्यांना त्यांच्या पायावर कसे उभे करता येईल, या प्रश्नाचे उत्तर त्याला शाश्वत जीवनशैलीच्या माध्यमातून मिळाले.
पण खरोखर हे शहरात राहणाऱ्या माणसाला शक्य होईल का?
चला तर मग, या प्रश्नाचे उत्तर किती वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकते ते पाहूया.