शाश्वत जीवनाची संकल्पना: प्रत्येकासाठी वेगळी!
मागील ब्लॉगमध्ये आपण पाहिले की, एका शाश्वत जीवनासाठी विचारांची कशी सुरुवात झाली आणि वाटचाल सुरू झाली. पण हे खरोखरच शक्य आहे का? यावर विचार केल्यावर उत्तर असे मिळाले की, प्रत्येकाची शाश्वत जीवनाची संकल्पना ही वेगळी असू शकते आणि त्यात काही 'चूक' किंवा 'बरोबर' असे नसते. आतापर्यंतच्या अनुभवानुसार आणि भेटलेल्या असंख्य व्यक्तींच्या निरीक्षणातून मला जे वाटते, ते खाली काही उदाहरणे देऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, थोडेफार पटते का ते! यामध्ये मला जे सुचले आणि जे अनुभवले, त्या परिस्थितींची उदाहरणे दिली आहेत. याव्यतिरिक्त अजून काही उदाहरणे असतील जी तुम्हाला सांगावीशी वाटत असतील, तर ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा.
विविध परिस्थितींमधील व्यक्ती आणि त्यांची शाश्वत जीवनाची संकल्पना:
१. शहरी वातावरणात वाढलेली व्यक्ती:
जी व्यक्ती शहरात जन्मली आणि जिचे पूर्ण आयुष्य शहरात गेले, सुट्टीच्या दिवसांमध्ये तिने फक्त थोड्या वेळासाठीच गाव अनुभवले. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये त्या व्यक्तीला जगण्यासाठीची स्पर्धा आणि त्यासाठी लागणारा पैसा सतत दिसला. अशा व्यक्तीसाठी शाश्वत जीवन कदाचित असे असू शकेल की, तिच्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी पैशाचा स्रोत असावा. शिवाय, तिचा राखीव निधी खूप मोठा असावा; जेणेकरून भविष्यात जग कितीही बदलले तरी तिच्या जीवनशैलीला काही त्रास होणार नाही. ही तिची शाश्वत जगण्याची संकल्पना असू शकते.
२. ग्रामीण वातावरणात वाढलेली व्यक्ती:
जी व्यक्ती गावात जन्मली आणि जिचे पूर्ण आयुष्य गावातच गेले. तिचे शिक्षण गावात किंवा जवळच्या तालुका ठिकाणापर्यंत झाले. त्या व्यक्तीला तिच्या परिस्थितीनुसार, आहे त्यात समाधान मानून आनंदात राहायची सवय झाली. तिच्यासाठी पैसा महत्त्वाचा होता; पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे होते तिचे स्वातंत्र्य आणि वेळ. अशा व्यक्तीला तिच्या गावात एखादा व्यवसाय किंवा जवळपास उदरनिर्वाहासाठी नोकरी मिळाली, तर ते तिच्यासाठी शाश्वत जगणे ठरते.
३. आर्थिक सुबत्ता असलेल्या शहरी कुटुंबातील व्यक्ती:
जी व्यक्ती शहरात जन्मली आणि जिचे पूर्ण आयुष्य शहरातच गेले. शिवाय, नशिबाने तिचा जन्म अशा कुटुंबात झाला होता जे आधीपासूनच आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होते. त्यांच्याकडे पूर्वजांपासून जमा केलेली किंवा स्वतः कमावलेली धनसंपत्ती असल्यामुळे, त्या व्यक्तीला आयुष्यात वेगवेगळे अनुभव घेता आले. तिने स्वतःही मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे पैसा कमावला होता. आता त्या व्यक्तीकडे वेगवेगळ्या मार्गांनी पैशाचा संचय झाला होता. तिला आता साधे आणि सहज असे आयुष्य जगण्याची इच्छा होती आणि त्यासाठी ती व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करून शहरात अथवा जिथे तिला साधे आणि सहज जगता येईल अशा शहरालगतच्या किंवा शहरापासून दूर असलेल्या गावात किंवा परदेशात जगायची इच्छा बाळगते. हे त्या व्यक्तीसाठी शाश्वत जीवन असू शकते.
४. आर्थिक सुबत्ता असलेल्या ग्रामीण कुटुंबातील व्यक्ती:
जी व्यक्ती गावात जन्मली आणि जिचे पूर्ण आयुष्य गावातच गेले. शिवाय, नशिबाने तिचा जन्म अशा कुटुंबात झाला जो आधीपासून चांगल्या आर्थिक परिस्थितीत होता. त्यांच्याकडे पूर्वजांपासून जमा केलेली किंवा कमावलेली लक्ष्मी असल्यामुळे त्या व्यक्तीला आयुष्यात वेगवेगळे अनुभव घेता आले. अशा व्यक्तीला कदाचित शहराची किंवा परदेशातील जगाची ओढ असू शकते आणि त्या व्यक्तीसाठी ते शाश्वत जीवन असू शकते. किंवा, आपल्या गावातच मिळवलेला लौकिक टिकवून ठेवत जगणे हेही तिच्यासाठी शाश्वत जीवन असू शकते.
आतापर्यंत पाहिलेली उदाहरणे ही काही बिकट परिस्थितीतून आलेली नाहीत; ही सर्वसामान्य आणि बऱ्याच लोकांच्या आयुष्याशी मिळतीजुळती होती. आता आपण जरा बिकट परिस्थितीतून जगत असलेल्या व्यक्तींना शाश्वत जीवन कसे वाटेल, याचा आपल्या परीने विचार करून बघूया.
बिकट परिस्थितीतून आलेल्या व्यक्तींसाठी शाश्वत जीवनाची संकल्पना:
१. सतत संघर्ष करत जगणारी व्यक्ती:
जी व्यक्ती शहरात किंवा गावात जन्मली आणि जिचे पूर्ण आयुष्य शहरात/गावात गेले; परंतु त्या व्यक्तीला जगण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. आधीपासून असलेली संकटे आणि त्यातून आलेली नवीन संकटे यांना तोंड देत प्रत्येक दिवस ढकलत जगत असलेल्या व्यक्तीसाठी शाश्वत जीवन म्हणजे कदाचित सर्व संकटांपासून मुक्ती—मग ती पैशाच्या माध्यमातून असो वा विचारांच्या माध्यमातून. एकदा ही मुक्ती मिळाली की, दररोजच्या गरजा भागतील एवढा पैसा कमावून जगणे हे तिचे शाश्वत जीवन असू शकते. हे शाश्वत जीवन कदाचित त्याच ठिकाणी किंवा एखाद्या वेगळ्या, ओळखीच्या किंवा अनोळखी गाव किंवा शहरात असू शकते.
२. आयुष्यात चढ-उतार अनुभवलेली व्यक्ती:
जी व्यक्ती शहरात किंवा गावात जन्मली आणि जिचे पूर्ण आयुष्य शहरात/गावात गेले. सुरुवातीला त्या व्यक्तीचे आयुष्य सर्वसामान्यांप्रमाणे होते. त्यानंतर अचानक काही गोष्टी बदलल्या आणि त्यांचे आयुष्य कठीण परिस्थितीत गेले. यातून त्या व्यक्तीने आलेल्या अनुभवांतून आणि असलेल्या परिस्थितीतून कुटुंब सावरत वाटचाल केली. आता त्या व्यक्तीकडे चांगल्या प्रकारे धनसंचय झाला आहे. अशा व्यक्तीला कदाचित तिच्या आधीच्या अनुभवामुळे कठीण परिश्रम करून कसे जगायचे आणि आलेल्या चांगल्या परिस्थितीत जमिनीवर पाय ठेवून कसे राहायचे याची कल्पना असल्यामुळे, कदाचित तिचे शाश्वत जीवन आतापर्यंत न अनुभवलेल्या जगात वावरण्याचे असू शकते किंवा आलेल्या अनुभवांमुळे योग्य पद्धतीने धनाचा संचय करून आरामात जगायचे असू शकते.
आता अशा व्यक्तींकडे जाऊ, ज्यांना जीवनाच्या चढ-उतारात थोडे वेगळे जगण्याची इच्छा असू शकते.
१. स्थलांतराची इच्छा असलेली व्यक्ती:
जी व्यक्ती शहरात किंवा गावात जन्मली आणि जिचे पूर्ण आयुष्य शहरात/गावात गेले. आतापर्यंतच्या अनुभवांमुळे त्या व्यक्तीला वाटते की, मला माझे पुढचे आयुष्य अशा ठिकाणी घालवायचे आहे जिथे मी जन्मलो नाही. जसे की, शहरातील व्यक्तीला गावात जाऊन राहावेसे वाटणे किंवा गावातील व्यक्तीला शहरात जगावेसे वाटणे हे त्यांच्यासाठी शाश्वत जीवन असू शकते.
जर तुम्ही इथपर्यंत वाचत आला असाल, तर तुमच्या मनात शाश्वत जीवन कसे असू शकते हे कमेंटमध्ये नक्की लिहा. ती व्यक्ती... शाश्वत जीवन कशी जगेल?